सडक अर्जुनी, 10 डिसेंबर: रायपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील सडक अर्जुनी तालुक्यातील देवपायली येथील शशीकरण मंदिराजवळ उड्डाणपूल बांधणीचे काम अग्रवाल कंपनीकडून सुरू आहे. मात्र, या रस्त्यावर सुरक्षा उपाययोजना आणि बॅरिगेट्स नसल्यामुळे आज सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला.
रायपूरहून नागपूरकडे जात असलेला 16 चाकी ट्रेलर (क्रमांक CG 22 J 7303) मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात सेफ्टी बॅरिगेट्स नसलेल्या सर्व्हिस रोडवरून खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रेलर चालक भूपेंद्र अंबरनाथ यादव (वय 35, रा. भिलाई) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पत्रकार मुन्ना सिंग ठाकूर यांनी स्थानिक बीट जमादार विजय कोटांगले यांना कळवले आणि महावितरण कार्यालयाला विद्युतपुरवठा खंडित करण्याचे सूचित केले. हेड्राच्या मदतीने चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची पुढील चौकशी डुग्गीपार पोलीस करीत आहेत.
महामार्गावरील सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी आणि अग्रवाल कंपनीकडून सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या गंभीर दुर्घटनेमुळे रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.