गोंदिया, दि. २४: गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी पुढील अडीच वर्षांसाठी निवड प्रक्रिया आज, २४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेतील गटनेते लायकराम भेंडारकर यांची उमेदवारी निश्चित केली आहे.
या संदर्भात काल चोरखमारा येथे भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला भाजप प्रदेश नेतृत्वाने नियुक्त केलेले निरीक्षक आमदार गिरीश व्यास, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार डाॅ. परिणय फुके, आमदार विजय रहागंडाले, आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, भाजप जिल्हाध्यक्ष डाॅ. येशुलाल उपराडे, संघटन मंत्री बाळा अंजनकर आणि जिल्हा कोअर कमिटीचे अन्य सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी लायकराम भेंडारकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराची निवड निश्चित मानली जात आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, भाजपच्या या निर्णयानंतर जिल्हा राजकारणात मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
