हिराटोला (ता. गोरेगाव) येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक परिवर्तन संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, माजी सभापती मनोजभाऊ बोपचे, के. के. डोंगरे सर, सरपंच माधवी ताई डोंगरे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार बडोले यांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाचे स्मरण करून बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीत त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला. “बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या रमाई नसत्या, तर सामाजिक क्रांती आणखी कठीण झाली असती,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही माता रमाई यांच्या कार्याची आठवण करून देत समाज परिवर्तनासाठी एकजूट राहण्याचा संदेश दिला. संमेलनाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
