मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत राज्य सरकारवर निशाणा साधत “एक खोक्याभाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा भरलीय,” अशी सूचक टीका केली. त्यांनी स्पष्टपणे नाव न घेता सरकारमधील आमदारांना उद्देशून हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे म्हणाले, “मूळ विषय बाजूला पडतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला भरकटवून टाकलं जात आहे. आत विधानसभेत सगळे खोकेभाईच भरले आहेत,” अशा शब्दांत त्यांनी खोचक टोला लगावला.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी राज ठाकरेंना लक्ष्य करत “ज्यांना लोक निवडून देत नाहीत, ते विधानसभेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते बाहेर बसून विधान करतात,” असा उपरोधिक हल्ला चढवला.
राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून, त्यांच्या या टीकेला इतर पक्षांकडूनही प्रतिसाद येण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वाक्य चर्चेचा विषय ठरले आहे.
