साकोली (तालुका प्रतिनिधी) : जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. भंडारा व तालुका आरोग्य अधिकारी, साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आशा स्वयंसेविकांसाठी ‘आशा दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आशा स्वयंसेविकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांची कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन समाजकल्याण सभापती शीतलताई राऊत यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य वनिताताई डोये, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवकुमार नैतामे, जिल्हा प्रशिक्षण केंद्र भंडारा येथील डॉ. रुपेश बडवाईक, तालुका आरोग्य अधिकारी स. सी. नेटीकर, तसेच आरोग्य पर्यवेक्षक पंचायत समिती साकोली उपस्थित होते.
आशा स्वयंसेविकांच्या कार्याचा सन्मान
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आशा स्वयंसेविका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आणि समाजात त्यांच्या कार्याची जाणीव होण्यासाठी ‘आशा दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ज्या आशांच्या कार्यक्षेत्रात माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण शून्य आहे, अशा स्वयंसेविकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत
आशा दिवसाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात आशा स्वयंसेविकांनी ऐकलं नृत्य, समूह नृत्य, गीतगायन, पथनाट्य आणि रांगोळी स्पर्धा अशा विविध कलाकृतींमधून आपली सृजनशीलता सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संगीता झोडे (आशा स्वयंसेविका) यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना कु. स्वाती शहारे (तालुका समूह संघटक) यांनी मांडली, तर आभारप्रदर्शन श्रीमती कांचन नंदागवळी (आशा स्वयंसेविका) यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. आशिष मारवाडे, श्री. अशोक ब्राम्हणकर, श्री. राजू फुंडे, श्री. सचिन नेवारे, श्री. रंजित जांभूळकर, श्रीमती कल्पना चौधरी, कु. स्वाती शहारे, कु. अपर्णा कठाणे, कु. अस्विता गायधणे आणि सर्व आशा गटप्रवर्तक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
आशा दिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील आशांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या कार्याची महती समाजासमोर आली. या उपक्रमामुळे आशा स्वयंसेविकांच्या कार्याची अधिक चांगल्या प्रकारे ओळख होण्यास मदत झाली आहे.