भंडारा
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांकरिता स्वतंत्र्य मंत्रालय स्थापित करण्याचा निर्णय घेवून दिव्यांगांना खरा न्याय देण्याचे काम केले आहे. असे मंत्रालय असणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानावे तेवढे उपकार कमी असल्याचे वक्तव्य भंडारा विधानसभेचे आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले.
पवनी येथील लक्ष्मीरमा सभागृहात प्रहार संगटनाद्वारा जागतिक दिव्यांग दिनी आयोजित विविध कार्यक्रमाच्या उद््घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हा प्रमुख विजय काटेखाये, पवनी शहर प्रमुख देवराज बावनकर, विधानसभा प्रमुख बाळू फुलबांधे, नरेश बावनकर, बंडू हटवार व प्रहारचे जिल्हा अध्यक्ष अंकुश वंजारी, जिल्हा उपाध्यक्ष दुधराम बावनकर मंचावर उपस्थित होते.
दिव्यांगांकरिता स्वतंत्र मंत्रालयाची मागणी कित्तेक वर्ष जुनी होती आणि कोणत्याही शासनाने याला गंभीरतेने घेतले नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांगांची ही मागणी पूर्ण केली असल्याचे आ.भोंडेकर यांनी सांगितले. भंडारा विधानसभेतील दिव्यांग बांधवांकरिता 50 बॅटरीवर चालणारी सायकल देण्याची घोषणा करीत दिव्यांग बांधवांना हक्काची जागा म्हणून दिव्यांग भवन बांधून देण्याचे आश्वासन दिले. त्याकरिता 25 लक्ष रुपये आमदार निधीतून देण्याची घोषणाही केली. सोबतच दिव्यांग बांधवांना कसलीही अडचण भासू न देण्याचे आश्वासन आ.भोंडेकर यांनी दिले.
…….