तुमसर
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तुमसर येथील राखीव जागेत मोठ्या प्रमाणात भूखंड रिकामे पडून आहेत. या रिकाम्या भूखंडात पावसाचे पाणी साचून तेथे तलाव निर्माण झाले आहेत. परंतु प्रशासन स्थानिक उद्योजकांना रिकाम्या भूखंडांचे वाटप करीत नसल्याने नवतरुण उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे.
तुमसर ते गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे 30 वर्षांपुर्वी एमआयडीसी स्थापन करण्यात आली होती. कुटीर व लघू उद्योग येथे स्थापन व्हावेत, यासाठी उद्योजकांनी भूखंड घेतले. परंतु अनेक उद्योजकांनी येथे जागा ताब्यात घेवून प्रत्यक्षात उद्योग सुरू केलेच नाही. त्यामुळे देव्हाडी एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात भूखंड अद्याप रिकामे आहेत. यावर पावसाचे पाणी साचून तेथे तलाव तयार झाले आहेत. बाजूचा नाला पावसाळ्यात ओव्हरफ्लो होऊन त्याचेही पाणी एमआयडीसीच्या रिकाम्या भूखंडात शिरते. पाणी निचरा होण्याची सुविधा नसल्याने पाणी अनेक महिने साचून राहते. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे एमआयडीसीतील रिकाम्या भूखंडांची स्थानिक उद्योजकांना प्रतीक्षा लागली आहे.
चौकट
उद्योजकांना भूखंड मिळत नाही
उद्योग सुरू करण्याकरिता अनेक उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाकडे भूखंडाची मागणी केली. परंतु त्यांना भूखंड देण्यात आले नाहीत. सर्व भूखंड उद्योजकांना वितरीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तीन वर्षात उद्योग स्थापन करावा, असे करारनाम्यात नमूद करण्यात आले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने एमआयडीसी प्रशासनाने असे भूखंड परत घेण्याची गरज आहे. परंतु एमआयडीसी प्रशासनाचे कोणतेही अधिकारी येथे येऊन पाहणी करताना दिसत नाहीत.
चौकट
आत्मनिर्भर उपक्रमाला तिलांजली
केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत व्हावा, यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. येथील एमआयडीसीत केवळ बोटावर मोजण्या इतके उद्योग सुरू आहेत. तर अनेक नवीन उद्योजक उद्योग स्थापन करण्यासाठी वणवण भटकत आहेत. परंतु त्यांना भूखंड मिळत नाहीत. यासंदर्भात इच्छुक उद्योजकांनी निवेदन देऊनही आश्वासनापलीकडे काहीच मिळत नाही.
….