दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याचे ‘सक्षम’चे काम : अंधारे

0
18

भंडारा
दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी व्हावी, समाजात इतरांच्या तुलनेत त्यांना समक्ष म्हणून जगता यावे आणि कुटुंबाला हातभार लावण्याची क्षमता त्यांच्यात यावी या दृष्टीने दिव्यांगांना घडविण्याचे काम ‘सक्षम’ या संस्थेकडून केले जाते. दिव्यांग व्यक्ती आत्मनिर्भर व्हावा हाच आमचा मानस असल्याचे सक्षमचे राष्ट्रीय सहसचिव उमेश अंधारे यांनी स्पष्ट केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सक्षमच्या भंडारा जिल्हा अधिवेशनाचे व दिव्यांग दिन कार्यक्रमाचे आयोजन सक्षम व बहिरंगेश्वर देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या स्थानिक बहिरंगेश्वर मंदिरात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सक्षमचे अध्यक्ष डॉ. अतुल टेंभुर्णे, रमेश पांडे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आल्यानंतर सक्षमचे उपाध्यक्ष मिलिंद नानोटी यांनी पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांचे दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेले पुष्पगुच्छाने चित्र देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना उमेश अंधारे पुढे म्हणाले, दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन हळूहळू बदलत गेला. केवळ मदत करून मोकळे होणे हा दृष्टीकोन आता बदलून सेवाभाव दिसू लागला आहे. मात्र आता यातही बदल होऊन दिव्यांगाना आत्मनिर्भर करणे हे होणे गरजेचे असून सक्षमच्या माध्यमातून हाच प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. दिव्यांगांना केवळ मदत घेणारा न ठेवता तो देणारा कसा होईल यासाठी सक्षम प्रयत्न करीत आहे. 21 प्रकारच्या दिव्यांगता आहेत. बाधित म्हणजेच सिकलसेल सारखा आजारही दिव्यांगतेत गणला जात असल्याने अशा रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा आता मिळणार आहे. दिव्यांगला स्वावलंबी बनविण्याचा निर्धार करून जवळपास साडेतीनशे जिल्ह्यांमध्ये सक्षम काम करीत असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
यावेळी अंध आणि मूकबधिर विद्यार्थ्यांनी गायन, वादन आणि नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. पूर येथील मूकबधिर महिला जादूगर शितल किंमतकर यांनी जादूचे प्रयोग दाखवून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात काही दिव्यांग बांधवांचा विशेष सन्मान करण्यात आला. मूकबधिर विद्यार्थ्यांना हा संपूर्ण कार्यक्रम करावा म्हणून सक्षमच्या महिला अध्यक्षा नेहा चेपे यांनी सांकेतिक भाषेत या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रत्यक्ष वर्णन केले. संचालन वर्षा खोटेले यांनी केले. कार्यक्रमादरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे प्रतिनिधी हेमंत आंबेकर यांनी भंडारा येथे दिव्यांग भवन बांधण्याची घोषणा आमदारांनी केली असल्याचे सांगून लवकरच कामाला सुरुवात होईल असे सांगितले. कार्यक्रमानिमित्त परिसरात सक्षमची सुंदर रांगोळी चित्रा वैद्य यांनी साकारली होती. कार्यक्रमाला संघाचे विभाग कार्यवाह अतूल दिवाकर, नगर कार्यवाहक रामकृष्ण बिसने व अन्य मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विनय शृंगारपवार, शिवानंद चेपे, गोविंद कापगते, सोनाली निचकवडे, अक्षय पाटूलवार यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
JB\'s, Modi Complex, College Road, Sakoli-8275112833

Leave a Reply