बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रोड्यूसर अनुष्का शर्मा हिने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत सध्याच्या समाजात वाढणाऱ्या घटस्फोटाच्या प्रमाणावर मत व्यक्त केले आहे. अनुष्काने सांगितले की, “आजच्या काळातील महिला आपल्या जोडीदारासोबत समांतरपणे प्रगती करायची इच्छा बाळगतात. त्यांना कोणत्याही दबावाखाली जीवन जगायचं नाही. पूर्वी महिलांना खूप काही सहन करावं लागत असे, पण आता त्यांच्या विचारसरणीत मोठा बदल झाला आहे. त्या आता स्वतःच्या स्वाभिमानावर, आयुष्यावर आणि स्वतंत्र निर्णयावर भर देतात. जिथे समानता, आदर आणि स्वातंत्र्य नाही, तिथे नातेसंबंध टिकत नाहीत.”
अनुष्काच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, नात्यातील संवादाचा अभाव, स्वतंत्र निर्णय घेण्याची संधी न मिळणे आणि एकमेकांचा सन्मान न करणे हे घटस्फोटाचे मुख्य कारण आहे. अनुष्काच्या या परखड मतामुळे अनेक महिला आणि तरुण जोडप्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या असून तिच्या विचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
