औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगरजवळ भिंगार येथे झाला आणि त्यानंतर त्याच्या इच्छेनुसार खूलताबाद येथे त्याला दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूपत्रानुसार, कमावलेल्या काही पैशांतूनच साधी कबर बांधावी अशी त्याची इच्छा होती. परंतु, काळाच्या ओघात ती कबर भव्य मकबऱ्यात परिवर्तित झाली आहे. आज ती कबर फक्त एक ऐतिहासिक वास्तू न राहता, महाराष्ट्रात मोठा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वादाचा विषय ठरली आहे.
काहीजण ही कबर हटवावी अशी मागणी करत आहेत, कारण औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज, गुरू तेग बहादूर यांच्यासह अनेकांवर क्रूरता केली होती. दुसरीकडे, काही इतिहासकारांचा आणि विचारवंतांचा असा मत आहे की औरंगजेबाशिवाय मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास अपूर्ण आहे, आणि ही कबर त्या इतिहासाची आठवण म्हणून राहिली पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की, ही कबर एएसआयद्वारे संरक्षित स्मारक आहे आणि ती हटवणे कायदेशीर दृष्ट्या शक्य नाही. मात्र, केंद्र सरकार यावर निर्णय घेऊ शकते. केंद्र सरकारला जर असे वाटले की ही वास्तू आता राष्ट्रीय महत्त्वाची राहिलेली नाही, तर ती यादीतून वगळता येऊ शकते. त्यानंतर कबर वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत जाईल, परंतु तेथेही अनेक कायदेशीर अडथळे आहेत.
या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. एकीकडे कायदेशीर अडथळे, तर दुसरीकडे सामाजिक तणाव आणि राजकीय रंग या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सरकार या विषयाकडे कसा पाहणार आणि पुढील निर्णय काय घेणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
