भंडारा :
तुमसर तालुक्यातील वैनगंगा आणि बावनथडी या नद्यांतील उच्च दर्जाच्या वाळूला मोठी मागणी असल्याने तस्करांनी नव्या युक्त्यांनी प्रशासनाला चकवा देण्याचा प्रयत्न केला आहे. नियमाप्रमाणे, वाळू वाहतुकीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या वाहनांना जिओ टॅगिंग लावणे बंधनकारक आहे. मात्र, तस्करांनी दुचाकीला जिओ टॅग लावून ती महाराष्ट्राच्या सीमेत आणण्याचा क्लृप्तीपूर्ण मार्ग शोधला आहे. त्यानंतर हेच जिओ टॅग वाहतूक करणाऱ्या ट्रक किंवा टिप्परला लावले जाते आणि वाळू थेट नागपूरला पोहचवली जाते.
हा गंभीर प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हा मुद्दा आमदार नाना पटोले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करताच महसूलमंत्र्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर तपासणीला सुरुवात होणार असल्याने यामध्ये मोठे नावेदेखील अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कशी चालते आंतरराज्य वाळू तस्करी
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बावनथडी नद्यांमध्ये वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मध्यप्रदेशमध्ये अधिकृत लिलावानंतर घाट सुरू आहेत, मात्र महाराष्ट्रात लिलावाऐवजी डेपो पद्धती सुरू करण्यात आली आहे. तुम्हसर तालुक्यातील उमरवाडा, पांजरा (रेंगेपार), मांडवी, सोंड्या, चारगाव, लोभी आणि आष्टी या सात डेपोचा यात समावेश आहे. मात्र उमरवाडा डेपोला पर्यावरण मंजुरी नसल्याचेही बोलले जात आहे. अनधिकृत वाळू उपसा सर्रास सुरू असून त्यावर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
