मुंबई : राज्य सरकार एसएससी (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव आखत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. हा निर्णय राज्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत घातक ठरेल, अशी टीका करत सुळे यांनी सरकारने याबाबत पुन्हा विचार करावा अशी जोरदार मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “एसएससी बोर्ड हा महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. तो बंद केल्यास लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. शिक्षण हे राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि त्यात अशा तऱ्हेचे निर्णय घेताना पालक, विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शासनाने हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.”
सदर प्रकरणी शिक्षण विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, राज्यभरातून विरोधाच्या प्रतिक्रिया उमटत असून, हा मुद्दा आगामी अधिवेशनात गाजणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
