तिबेटी समुदायाचा अध्यात्मिक सोहळा; राजकुमार बडोले यांची उपस्थिती
गोंदिया : तिबेटी समुदायाच्या शिबिरात आयोजित भव्य बौद्ध धर्मीय कार्यक्रमात महान आध्यात्मिक गुरू कायब्जे योंगझिन लिंग रिनपोचे यांचे मार्गदर्शन लाभले. रिनपोचे यांनी १२ वर्षे ड्रेपुंग लोसेलिंग मठविद्यापीठात कठोर अध्ययन करून २१ व्या वर्षी ‘गेशे ल्हारामपा’ ही बौद्ध पंडित पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी ग्युटो तांत्रिक मठाचे शिस्तपाल आणि मठाधिपती म्हणून धार्मिक प्रबोधनाची जबाबदारी सांभाळली.
या कार्यक्रमात माजी मंत्री व अर्जुनी मोरगाव विधानसभा आमदार राजकुमार बडोले यांची उपस्थिती होती. रिनपोचे यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवचनातून उपस्थितांना शांती, साधना आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला. त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने सर्व सहभागी भाविकांना अनोखा आध्यात्मिक अनुभव मिळाला.
