गोठणगाव, १ डिसेंबर २०२४ – गोठणगाव येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात एक ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता घडली. मुदुल रुपेश नंदेश्वर (वय ३ वर्षे) हा आपल्या आई-वडिलांसोबत गोठणगाव येथे मंडई निमित्त आला होता आणि अंगणात खेळत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला.
मुलाच्या वडिलांनी चित्कार ऐकताच तत्काळ मुलाकडे धाव घेतली. त्यांनी बिबट्याला हाकलून लावले, मात्र बिबट्याने पुन्हा हल्ला चढवला. मुलाच्या वडिलांनी मोठ्या धाडसाने बिबट्याला दुसऱ्यांदा दूर केले. त्यानंतर मुलाला तातडीने गोठगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्याला पुढील उपचारांसाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले.
सध्या मुलावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. या घटनेमुळे गोठगाव आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे.
वनविभागाने तातडीने पावले उचलून बिबट्याला पकडण्यासाठी कार्यवाही सुरू केल्याचे सांगितले आहे.