तिरोडा (प्रतिनिधी) – वडेगाव येथील ज्ञानदा महिला कला व विज्ञान महाविद्यालयात २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण, देशभक्तिपर गीतं, प्रेरणादायी भाषणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए. झेड. नंदेश्वर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य छोटू देवपुरी उपस्थित होते. महाविद्यालयाचे संस्थापक व सचिव आर. बी. नंदेश्वर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रीय गीताला वंदन केले. यानंतर, उपस्थित मान्यवरांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकत युवकांना राष्ट्रसेवेचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला के. झेड. नंदेश्वर, राकेश क्षीरसागर, दुलीचंद शेवईवार, संजयकुमार उके, एकनाथ लांडगे, हितेश वालदे, भाऊ जांभुळकर, रोशन बडगे, प्रमिलाबाई टेंभेकर, उषाबाई उंदीरवाडे आणि नेपालचंद्र भास्कर यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी देखील या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. राष्ट्रभक्तिपर गीतं, भाषणं आणि नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान, स्वातंत्र्यसंग्राम आणि आधुनिक भारताच्या प्रगतीबाबत संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजय रंगारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन रत्नदीप बडोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अविनाश कांबळे, डॉ. एस. एस. गौरखेडे, डॉ. ए. एस. वासनिक, डॉ. आर. डी. काटेखाये तसेच निरंजन जनबंधू, दिगंबर राऊत, चंद्रशेखर उपरीकर, सुमेध शहारे, छाया राऊत, प्रियंका गजभिये आणि ममता बडगे यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची शपथ घेतली. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीमय वातावरणात पार पडला.