नागपूर: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकार आणि परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ घडलेल्या नासधूस व त्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून स्वतंत्रपणे केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
मुख्यमंत्र्यांनी दोन्ही प्रकरणांवर विधानसभेत सविस्तर उत्तर देत घटनांशी संबंधित कारवाईची माहिती दिली.
बीड सरपंच हत्या प्रकरण:
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीशी संबंधित असल्याचा संशय असून ती अत्यंत क्रूरपणे करण्यात आली आहे. देशमुख यांच्या डोळ्यांना मार लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेल्या चौकशीत वाल्मिक कराड याचा सहभाग आढळून आला आहे. कराडचा देशमुख हत्येत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल.
तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील खंडणीखोर, भूमाफिया आणि वाळू माफियांचा कडेलोट करण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्हा पोलीस प्रमुखांची बदली करून जबाबदारी योग्यप्रकारे न पाळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
परभणी हिंसाचार प्रकरण:
परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नासधूस व हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ यांना श्वसनाचा जुना आजार होता आणि गळ्याचे हाड आधीच तुटले होते, असे शवविच्छेदनात निष्पन्न झाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पोलिसांनी सोमनाथ यांच्यावर अनावश्यक बळाचा वापर केला का, याची चौकशी केली जाईल. संबंधित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
आमदार राजकुमार बडोले यांची परभणी प्रकरणी न्यायाची मागणी
नागपूर: परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील नासधूस व त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात पोलिस कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.
आमदार बडोले यांनी या प्रकरणात पोलिसांवरील कारवाईचा मुद्दा मांडत, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी केली. त्यांनी सांगितले की, “सोमनाथ सूर्यवंशी हा वडार समाजातील होतकरू युवक होता. कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या या तरुणाची कोठडीत मृत्यू होणे दुर्दैवी आहे. अशा घटनांमुळे पोलिसांवरील विश्वास उडण्याचा धोका आहे.”
सत्याचा शोध घेण्यासाठी न्यायालयीन चौकशीची मागणी:
बडोले यांनी या प्रकरणात सखोल चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशीची मागणी केली होती. तसेच त्यांनी पोलिसांच्या बळाचा वापर आणि संबंधित अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत स्पष्टता देण्याची मागणी केली.
आमदार बडोले यांनी परभणीतील तणावग्रस्त परिस्थितीची सखोल चौकशी होऊन दोषींना योग्य शिक्षा व्हावी, असे सांगितले. त्यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश देत, संबंधित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला.
आर्थिक सहाय्य व पीडितांना पाठिंबा:
आमदार बडोले यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणीही केली होती, ज्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले.
आमदार राजकुमार बडोले यांच्या कडक भूमिकेमुळे परभणी प्रकरण अधिक गांभीर्याने घेतले गेले आणि न्यायाच्या दृष्टीने योग्य पावले उचलली जात आहेत.