गोंदिया : प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया जिल्ह्याला आगामी अडीच वर्षांसाठी पुन्हा एकदा ‘पार्सल पालकमंत्री’ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभेत महायुतीच्या उमेदवारांनी घवघवीत यश मिळवले असले, तरी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते आणि जिल्हावासीयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडील विस्तारामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला पुन्हा एकदा संधी नाकारली गेल्यामुळे या भागातील जनतेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. स्थानिकांच्या मते, जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले असते तर या भागाचा विकास अधिक वेगाने झाला असता. मात्र, अनेकांच्या दृष्टीने हे जाणूनबुजून टाळण्यात आले आहे, आणि यासाठी थेट प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली जात आहे.
तिरोड्यातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभेत पहिल्यांदा कमळ फुलवणारे विनोद अग्रवाल तसेच अर्जुनी मोरगावमधून विजयी झालेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे इंजिनिअर राजकुमार बडोले यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळेल, अशी जिल्ह्याच्या जनतेची अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षाभंगामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह मावळल्याचे चित्र आहे.
गोंदियाचे अपूर्ण स्वप्न : ‘घरचे मंत्री’
गोंदिया हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचा गृहजिल्हा आहे. महायुती सरकारमधील अजित पवार गटाचा मजबूत सहभाग लक्षात घेता, गोंदियाला मंत्रीपद मिळेल, असा विश्वास होता. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात गोंदियाला वगळले गेले.
पाच वर्षांत पाच ‘पार्सल पालकमंत्री’
२०१९ पासून गोंदिया जिल्ह्याला सलग पाच परजिल्ह्यातील पालकमंत्री मिळाले. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे आणि धर्मरावबाबा आत्राम यांनी पालकमंत्री म्हणून काम पाहिले. या पालकमंत्र्यांनी प्रामुख्याने २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट किंवा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्ह्याला भेट दिली आणि त्वरित परतल्याचा अनुभव गोंदियाकरांना आहे. परिणामी, गोंदियात त्यांना ‘झेंडा मंत्री’ असे टोकाचे नाव दिले गेले.
नव्या पालकमंत्र्यांकडून अपेक्षा
गोंदिया जिल्ह्याला पुढील पालकमंत्री कोण मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परजिल्ह्यातील पालकमंत्री नियुक्त होणे निश्चित झाले असले, तरी त्यांनी मागील डाग पुसून काढावा, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने उपस्थित राहून काम करणे, हे नवे पालकमंत्र्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा
जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. या परिस्थितीत स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाला कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राखण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.
गोंदिया जिल्हा विकासासाठी सक्षम नेतृत्वाच्या प्रतिक्षेत असून, आता राज्य सरकारने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
धर्मराव बाबा आत्राम यांना मंत्रिमंडळातून वगळले; पटेलांशी तणावाचे जुने वाद चर्चेत
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात धर्मराव बाबा आत्राम यांना वगळण्यात आले आहे. मागील मंत्रिमंडळात त्यांना गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या या कार्यकाळात स्थानिक पातळीवर अनेक मुद्दे चर्चेत राहिले. विशेषतः, प्रफुल पटेल आणि धर्मराव बाबा आत्राम यांच्यातील वादामुळे राजकीय वातावरण तापले होते.