डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माईसाहेबांचे स्थान केवळ सहधर्मचारिणीचे नव्हते, तर त्यांच्या कार्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्या एक दृढ आधारस्तंभ होत्या. जरी माईसाहेबांना बाबासाहेबांचा सहवास केवळ आठ-नऊ वर्षांचा लाभला असला, तरीही तो काळ भारतीय सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरला.
१९४७ ते १९५६ या दशकात बाबासाहेबांनी अनेक ऐतिहासिक कार्ये पार पाडली—भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीपासून हिंदू कोड बिलाच्या लढ्यापर्यंत, तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेतील सहभागापासून मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेपर्यंत. या प्रत्येक टप्प्यावर माईसाहेबांचा सक्रिय सहभाग राहिला. बाबासाहेबांच्या साहित्य निर्मितीमध्येही त्यांचा अमूल्य हातभार होता. दि बुद्ध अँड हिज गॉस्पेल, बुद्ध अँड हिज धम्म, फिलॉसॉफी ऑफ हिंदूइझम, रिडल्स इन हिंदुइझम, बुद्ध और कार्ल मार्क्स यांसारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांच्या निर्मितीच्या प्रक्रियेत माईसाहेबांची साथ होती.
परंतु या सर्व ऐतिहासिक घटनांमध्ये सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेबांनी घेतलेली बौद्ध धम्मदीक्षा. या दिवशी बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना आपल्या स्वहस्ते धम्मदीक्षा दिली आणि एका नवीन युगाचा प्रारंभ झाला.
माईसाहेबांचे जीवन हे केवळ बाबासाहेबांच्या सहवासाने नव्हे, तर त्यांच्या संघर्षशील आणि ध्येयनिष्ठ वृत्तीनेही उजळलेले होते. त्या केवळ बाबासाहेबांच्या जीवनसाथी नव्हत्या, तर त्यांच्या विचारांची, ध्येयधोरणांची आणि मिशनची अविरत सोबती होत्या.
विनम्र अभिवादन!
शुभेच्छुक : राजकुमार बडोले, माजी मंत्री,
राजकुमार बडोले फाउंडेशन
