📍 विधानभवन, नागपूर
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महामहीम राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी राज्यपालांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त करत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले.
संविधानाच्या विटंबनेवर कडक कारवाईची मागणी
राजकुमार बडोले यांनी परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्याची घटना अत्यंत गंभीर असल्याचे विधानसभेत सांगितले. संविधानाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान असून, दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. याचसोबत या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंददरम्यान झालेली तोडफोड, पोलिसी कारवाई आणि एका तरुणाचा मृत्यू या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा: विशेष मागण्या
मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी नागपूर येथे पाली भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी विधानसभेत केली. मराठीसह पाली, बंगाली, आणि आसामी भाषांचे संवर्धन होण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, असे त्यांनी सुचवले.
तरुणाईसाठी रोजगार, महिलांसाठी प्रोत्साहन
राज्य सरकारने युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आणि महिला उद्योजकांना सुरुवातीच्या टप्प्यात २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल बडोले यांनी आभार मानले. याशिवाय, १ लाख ५३ हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला गती दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करत स्थलांतर रोखण्यासाठी अधिक रोजगार निर्मितीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिक्षण आणि कृषी क्षेत्रासाठी विशेष मागण्या
- अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी उत्पन्न मर्यादा ८ लाखांऐवजी अधिक लवचिक निकष लावावेत आणि १०० नामांकित जागतिक विद्यापीठांमध्ये फ्रिशिप योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
- मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याच्या निर्णयाचे कौतुक करत, त्यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २५,००० रुपये बोनस देण्याची मागणी केली.
धान उत्पादकांसाठी अभिनंदन
खरीप व रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये सरकारने ऐतिहासिक धान खरेदी केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. याचसोबत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे बोनस जाहीर करावा, असे त्यांनी सुचवले.
महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा
राजकुमार बडोले यांनी राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन करत महाराष्ट्राला स्वच्छ, पारदर्शक आणि निर्णयाभिमुख प्रशासन देण्याचे आवाहन केले.
अधिक वाचा:
संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा: राजकुमार बडोले विधानसभेत
#AapleSarkar #vidhansabha #MaharashtraVidhansabha #NCP #Mahayuti