मोरगाव (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा):छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सुरेंद्र भैसारे यांनी शिवाजी महाराजांच्या धर्मसहिष्णुतेचा व समाजसेवेचा आदर्श उजवल्याचे सांगितले. “शिवछत्रपतींनी स्वधर्माबरोबरच इतर धर्मांचा आदर करून समता, बंधुता व एकात्मतेचे बीज रुजवले. त्यांच्या प्रजाहितदक्ष राज्यकारभाराचे आजही आदर्श आहेत,” असे भैसारे यांनी भाषणात म्हटले. विषय शिक्षक पुरुषोत्तम गहाणे यांनी शिवकालीन इतिहास व महाराजांचे जीवनचरित्र सविस्तर सादर केले.
कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी लोदी, उपाध्यक्ष सोनू कराडे, सदस्य गीता नागोसे, उमा राऊत, जितेंद्र ठवकर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रावणी लाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रुचिता शहारे यांनी व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नाट्यप्रस्तुती सादर करून कार्यक्रमाला ओजस्वी केले.
