सडक अर्जुनी तालुक्यातील राका, चिखली, मनेरी, कोकणा आणि खोबा या गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळाने धान पिकांसह घरांचे मोठे नुकसान केले आहे. धानाचे पीक नुकतेच फुलोऱ्यावर आलेले असताना अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज प्रत्यक्ष या गावांचा दौरा केला. प्रत्येक गावात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा ऐकल्या आणि नुकसानग्रस्त शेतजमिनी तसेच घरांची पाहणी केली.
पाहणी दरम्यान आमदार बडोले यांनी संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले. “शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडे त्वरित पाठपुरावा करून मदतीची प्रक्रिया गतीमान करावी,” असे निर्देश त्यांनी दिले.
त्यांनी शेतकऱ्यांना धीर देताना सांगितले की, “तुमची ही अडचण मी माझी समजतो. शासन दरबारी तुमच्या मदतीसाठी आवाज उठवण्यात कोणतीही कसूर केली जाणार नाही.”
या दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी, माजी उपसभापती शालिंदर कापगते, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, सपना नाईक, किशोर बावनकर, ईश्वर कोरे, प्रल्हाद वरठे तसेच विविध गावांतील सरपंच, उपसरपंच आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने तहसीलदार इंद्रायणी गोमासे, तालुका कृषी अधिकारी लिलाधर पाठक, मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी सहाय्यक हेही घटनास्थळी उपस्थित राहून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक सहाय्य जाहीर व्हावे, अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
