सडक अर्जुनी – खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर व भरवशाची मदत मिळावी, या उद्देशाने पंचायत समिती, सडक अर्जुनी येथे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामपूर्व नियोजन व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक मान्यवरांची उपस्थिती राहिली.
या बैठकीत सडक अर्जुनी तहसीलदार इंद्रायणी गोमासे व गोरेगाव तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी शासकीय योजना तळागाळात पोहोचविण्यावर भर देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पंचायत समिती सभापती चेतन वळगाये व उपसभापती निशाताई काशिवार यांनी खरीप हंगामात बियाणे, खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबवण्यावर भर दिला.
जिल्हा परिषद सदस्य कविताताई रंगारी व डॉ. भूमेश्वर पटले यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर थेट संवाद साधत तत्काळ उपाययोजना आखण्याचे आदेश दिले. अर्जुनी मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत परशुरामकर यांनी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी विशेष मोहीम राबवण्याची घोषणा केली.
यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती शालिंदर कापगते, सदस्य शिवाजी पाटील गहाणे, अल्लाउद्दीन राजानी, रुकीराम वाढई, सपनाताई नाईक, दीपालीताई मेश्राम यांनीही आपले मत मांडले.
गटविकास अधिकारी रवींद्र सानप व गोरेगाव तालुका कृषी अधिकारी एस.जे. पातोडे यांनी खरीप हंगामासाठी विभागाच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. कृषी विभागातील अन्य अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या सहकार्याने खरीप हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीचा मुख्य हेतू कृषी संकटांना सामोरे जाण्यासाठी एकत्रित नियोजन व शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याचा होता.
