पुणे, दि. ९ एप्रिल २०२५ – महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक खास योजना जाहीर केली आहे, जी QS (Quacquarelli Symonds) रँकिंग २०० च्या आत असलेल्या परदेशी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षण किंवा पीएच.डी. करणार्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
या योजनेंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अशा एकूण ७५ पात्र विद्यार्थ्यांना पूर्ण शिक्षण फी, दरवर्षी USD १५०० (UK साठी GBP ११००) इतका निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, तसेच भारत-परदेश विमान प्रवासाचा खर्च शासनाकडून दिला जाणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या परदेशी विद्यापीठांची QS रँकिंग २०० च्या आतील असावी व त्यांना Unconditional Offer Letter प्राप्त झालेले असावे. अर्जदाराचे कुटुंब वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे व वयोमर्यादा पदव्युत्तरसाठी ३५ व पीएच.डी. साठी ४० वर्षे असावी.
या योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील केवळ दोन मुलांनाच लाभ घेता येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रही सादर करणे बंधनकारक आहे.
अर्ज करण्यासाठी : https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून फॉर्म डाऊनलोड करून, तो पूर्ण भरून १७ मे २०२५ रोजी संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत पुणे येथील संचालनालयात समक्ष किंवा पोस्टाने सादर करावा लागेल.
या योजनेमुळे गरजू पण गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी मिळणार असून, शासनाच्या या पावलाचे शैक्षणिक क्षेत्रात स्वागत केले जात आहे.
अर्ज कसा करावा?
विद्यार्थ्यांनी https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन शिष्यवृत्ती योजनेसाठीचा अर्ज नमुना डाउनलोड करावा. तो पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह दिनांक १७ मे २०२५ पर्यंत संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत खालील पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा पोस्टाने सादर करावा:
पत्ता:
इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय,
आकार प्रिमायसेस, दुसरा मजला,
एम.एच.बी. कॉलनी, म्हाडा कमर्शियल कॉम्प्लेक्स,
समता नगर, येरवडा, पुणे – ४११००६
अर्ज व अधिक माहितीसाठी हे संकेतस्थळ देखील पाहता येईल:http://www.maharashtra.gov.in

