भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने भव्य तालुकास्तरीय मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता महाप्रज्ञा बुद्ध विहार, लाखनी येथून सुरू होणारा मोर्चा बसस्थानक मार्गे तहसील कार्यालय लाखनी येथे भव्य सभेत रूपांतरित होईल.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन का?
महाबोधी महाविहार, जिथे भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, हे जागतिक बौद्ध समाजासाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. सम्राट अशोकांनी ई.स.पू. तिसऱ्या शतकात बांधलेले हे महाविहार सध्या महाबोधी मंदिर व्यवस्थापन समिती (BTMC) द्वारे नियंत्रित आहे. तथापि, १९४९ च्या कायद्यानुसार या समितीत हिंदू बहुसंख्य असतात आणि महाविहाराच्या प्रमुख पुजाऱ्याचा पद देखील ब्राह्मण पुजाऱ्यांकडे असते.
भारतीय संविधानानुसार प्रत्येक धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाचा अधिकार त्या धर्मीयांनाच मिळावा, पण महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मियांचा संपूर्ण ताबा नाही. म्हणूनच, १२ फेब्रुवारी २०२५ पासून बोधगया येथे पूज्य भिक्खू संघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले आहे.
लाखनीतील भव्य मोर्चा – बौद्धांच्या हक्कासाठी मोठा लढा
या आंदोलनाला देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात २५ मार्च रोजी भव्य मोर्चा व सभा आयोजित करण्यात आली आहे.
