भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडेच सोपविण्याचा विचार केल्याची माहिती मिळत आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील विजेतेपदानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नऊ महिन्यांत दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये रोहितला पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असे क्रिकेट विश्लेषकांचे मत आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या कसोटी सामन्यातून रोहितला वगळण्यात आले होते. मात्र, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये त्याने भारताला दिलेल्या नेतृत्वाचा विचार करता बीसीसीआय कसोटी क्रिकेटसाठीही त्याच्यावर विश्वास दाखवण्याची शक्यता आहे. सध्या कसोटी संघासाठी पर्यायी कर्णधाराचा ठोस पर्याय नसल्याने रोहितलाच ही जबाबदारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे समजते.
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जून महिन्यात इंडियन प्रीमियर लीग (IPL) संपल्यानंतर होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय लवकरच या निर्णयाची अधिकृत घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे.
