सध्या देशात धमक्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे, आणि त्यातच एक नवीन गंभीर प्रकरण समोर आले आहे. तब्बल 85 विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी दिली गेल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. धमकी कोणाकडून दिली गेली आणि त्यामागील कारण काय आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कुठल्या कंपन्यांच्या विमानांना आली आहे ही धमकी?
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या 20, एअर इंडियाच्या 20, विस्तारा एअरलाइन्सच्या 20, आणि अकासा एअरलाइन्सच्या 2 विमानांसह एकूण 85 विमानांना धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवडाभरात 90 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांना अशाच स्वरूपाच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामुळे दिल्ली पोलिस सतर्क झाले असून, अकासा, इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांचे विमानं उडवण्याची धमकी विशेषतः आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात आठ वेगवेगळ्या FIR दाखल करण्यात आल्या आहेत.
धमकीबद्दल अधिकाऱ्यांची माहिती:
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, हे धमकीचे मेसेज प्रथम एक्स मायक्रोब्लॉगिंग साईटवर दिसून आले होते. तपास अधिकाऱ्यांनी काही प्रारंभिक मेसेज फेटाळले, पण 16 ऑक्टोबरपासून ही प्रकरणं गंभीर बनली. या नवीन आणि धक्कादायक धमकीनंतर तपास यंत्रणा अलर्ट मोडवर असून, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल विभागाने सर्व घटनांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
या धक्कादायक घटनाक्रमामुळे हवाई सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेतली जात असून, तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहेत.