मौदा, २६ जानेवारी २०२५ – राष्ट्रप्रेम व धार्मिक श्रद्धेच्या वातावरणात मौजा मौदा येथे परमात्मा एक मंडळ, नागपूरच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य झेंडावंदन व सामूहिक हवन कार्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी राज्याचे राज्यमंत्री श्री. आशिषजी जायस्वाल, परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजुजी मदनकर, खासदार श्री. श्यामकुमारजी बर्वे, आमदार श्री. कृपालजी तुमाने, माजी आमदार श्री. टेकचंदजी सावरकर यांच्यासह मंडळाचे सर्व संचालक आणि हजारो सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भव्य राष्ट्रध्वज उभारून त्याला मानवंदना देऊन झाली. यानंतर सामूहिक हवन कार्य पार पडले, ज्यामध्ये उपस्थित सेवकांनी पवित्र अग्नीसमोर प्रार्थना करत राष्ट्र उन्नतीची कामना केली.
या प्रसंगी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारताच्या लोकशाही मूल्यांचे महत्त्व पटवून दिले आणि सेवाभावी संस्थांच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी परमात्मा एक मंडळाच्या कार्यशैलीचे विशेष उल्लेख करत समाजकल्याणाच्या कार्यात असे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करत भारतीय संविधानाने दिलेल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव ठेवून कार्य करण्याचा संदेश दिला. मंडळाचे अध्यक्ष राजुजी मदनकर यांनी मंडळाच्या समाजसेवी कार्याची सविस्तर माहिती दिली आणि भविष्यात देखील असेच विधायक उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष श्री. लायकराम भेंडारकर यांनी देखील हजेरी लावली आणि राष्ट्रहिताच्या कार्यात सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या सोहळ्याने उपस्थित नागरिक व सेवकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून, परमात्मा एक मंडळाच्या या उपक्रमाने समाजात सकारात्मक संदेश दिला.
