मुंबई,
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना सहकारी नोंदणी व संबंधित कामांसाठी बाहेरच्या ठिकाणी जावे लागते, कारण मुंबई, सडक अर्जुनी येथे असलेले सहायक निबंधक कार्यालय मागील २२ वर्षांपासून अस्तित्वात नाही. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार राजकुमार बडोले यांनी राज्याचे सहकार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मा. बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन सदर कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
यासंदर्भात आमदार बडोले यांनी मंत्र्यांना निवेदन सादर केले. सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
सहायक निबंधक कार्यालय नसल्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना सहकारी संस्थांच्या नोंदणी, ऑडिट, कर्जप्रकरणे, व अन्य शासकीय योजनांसाठी जिल्ह्याच्या मुख्यालयात जावे लागत होते. त्यामुळे वेळ व खर्च वाढत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या.
नागरिकांच्या सोयीसाठी ठोस पावले
आमदार राजकुमार बडोले यांनी यापूर्वीही मतदारसंघाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. सहायक निबंधक कार्यालय सुरू झाल्यास स्थानिक सहकारी संस्था व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकरी, व्यापारी व सहकारी संस्थांच्या कामांना गती मिळेल आणि शासकीय प्रक्रियेत सुलभता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.