अरततोंडी, ता. अर्जुनी मोरगाव (2 फेब्रुवारी): तालुक्यातील अरततोंडी / दाभणा गावाजवळील तलावात बुडून दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी उघडकीस आली. या दुर्घटनेत रितीक रुपराम पातोळे (वय 13) आणि दुर्गेश धनंजय पातोळे (वय 13, दोघेही रा. अरततोंडी) या दोन निष्पाप बालकांनी जीव गमावला.
घटनेचा घटनाक्रम
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही बालक अरततोंडी गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवीत शिकत होते. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ते खेळण्यात दंग होते. सकाळी अंदाजे 10 ते 11 च्या सुमारास पिंपळगाव-अरततोंडी मार्गावरील तलावाजवळ गोरे (बैल) धुण्यासाठी गेले होते. तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले होते. खेळता खेळता ते खोल पाण्यात गेले आणि दुर्दैवाने त्यांना पोहता येत नसल्यामुळे ते पाण्यात बुडाले.
ही घटना दुपारी 3.30 ते 4 वाजेच्या सुमारास गावकऱ्यांच्या लक्षात आली, त्यानंतर संपूर्ण गावात हाहाकार माजला. गावकऱ्यांनी तातडीने तलावाच्या दिशेने धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांच्या मृतदेहाकडे पाहून कुटुंबियांसह ग्रामस्थांनी हंबरडा फोडला.
हुशार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
रितीक आणि दुर्गेश हे दोघेही अत्यंत हुशार विद्यार्थी होते. नुकत्याच 26 जानेवारीला त्यांचा शाळेच्या वतीने “हुशार विद्यार्थी” म्हणून सत्कार करण्यात आला होता. अशा होनहार विद्यार्थ्यांचा अचानक झालेला दुर्दैवी मृत्यू गावातील प्रत्येकाला हेलावून गेला आहे.
गावात शोककळा – आई-वडिलांचा आक्रोश
हे दोघेही आपल्या आई-वडिलांचे एकुलते एक चिरंजीव असल्यामुळे पातोळे कुटुंबावर काळाचा घाला कोसळला आहे. त्यांच्या मातापित्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले. संपूर्ण गाव शोकमग्न झाला असून, हा धक्का गावकरी अजूनही सावरू शकलेले नाहीत.
पोलीस प्रशासनाची तत्परता
घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
आमदार राजकुमार बडोले यांनी दिली घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच आमदार राजकुमार बडोले यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत, शासन स्तरावरून शक्य ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच गावकऱ्यांनी लहान मुलांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणार नाहीत, यासाठी दक्ष राहावे, असे आवाहन केले.
संपूर्ण गाव शोकमग्न
अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण अरततोंडी व परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली आहे. प्रत्येकाच्या मनात हाच विचार आहे की, अजून थोडी खबरदारी घेतली असती, तर कदाचित दोन निष्पाप जीव आज आपल्यासोबत असते.
◾️ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागरिकांनी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.