नवी दिल्ली: पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुढील आठवडाभर जोरदार वारे आणि धुळीच्या वादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वाऱ्याचा वेग वाढल्याने दृष्यमानता कमी होण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, दक्षिण भारतातील तेलंगणामध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. १८ मार्चपर्यंत ही स्थिती टिकून राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होत असताना, मध्य भारतातील छत्तीसगडमध्येही तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत छत्तीसगडमध्ये तापमान दोन अंशांनी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी गरमीपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.
