अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महायुतीच्या वतीने तिकीट वाटपाचा पेच “चिन्ह तुमचा, उमेदवार आमचा” या फॉर्म्युल्यावर सोडविण्यात आला आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अधिकृतपणे प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील तिकीट कोणाला मिळणार याबाबत विविध चर्चांचा बाजार गरम होता, मात्र आज या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
“चिन्ह तुमचा, उमेदवार आमचा” हे समीकरण
महायुतीत झालेल्या या तिकीटवाटपाच्या चर्चेत राजकुमार बडोले यांना उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे, तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह स्वीकारले आहे. महायुतीने हे समीकरण महाराष्ट्रातील इतरही काही विधानसभा मतदारसंघात लागू केले आहे. हा फॉर्म्युला अर्जुनी मोरगावमध्येही कितपत यशस्वी होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांची राजकीय कारकीर्द
सध्याचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या कारकीर्दीबद्दल विविध चर्चा सुरू होत्या. त्यांच्या कार्यशैलीबद्दल पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी तक्रारी झाल्या होत्या. अजित पवारांच्या आशीर्वादाने त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे आणली असली तरीही जनतेशी व पक्षातील कार्यकर्त्यांशी त्यांचे नाते घट्ट झालेले दिसत नाही. त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटी मतदारांमध्ये त्यांच्या विरोधात नाराजी दिसून आली. यामुळे चंद्रिकापुरे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
महायुतीचा उमेदवार निश्चित, महाविकास आघाडीचा अजूनही प्रश्नचिन्ह
महायुतीने अर्जुनी मोरगाव मतदारसंघात आपला उमेदवार ठरविला असला तरी महाविकास आघाडीने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. सध्याचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे तुतारी गटात प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता शरद पवार चंद्रिकापुरे यांना समर्थन देतील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, विदर्भातील कोणतीही जागा काँग्रेस सोडायला तयार नसल्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापुढेही मोठा निर्णय घेण्याचे आव्हान आहे.
सुगत चंद्रिकापुरे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा
मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र सुगत चंद्रिकापुरे यांच्यावर तरुणाईचा विश्वास आहे. त्यांनी मतदारसंघात केलेले सामाजिक काम आणि त्यांची युवा छवी यामुळे त्यांची उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. जर प्रमुख पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली नाही, तरीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा त्यांचा विचार आहे. उच्चशिक्षित असलेल्या सुगत चंद्रिकापुरेंनी आपल्या कामाच्या जोरावर मतदारसंघात चांगली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी युवा मतदारांसाठी आकर्षण ठरू शकते.
Nana Patole: पटोलेंच्या गृह जिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वारे
भाजप-राष्ट्रवादी संबंधांचे नवे समीकरण
माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असला तरी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नाते अजूनही फारसे घट्ट झालेले नाही. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांनी पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे आता भाजपच्या मतदारांनी राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर मत दिले पाहिजे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते, जे पूर्वी भाजपशी संबंधित होते, ते बडोले यांना मन:पूर्वक साथ देतील का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
राजकुमार बडोले यांचे मतदारसंघातील स्थान
राजकुमार बडोले हे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात भाजपमधून झाली असली तरी आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केले आहेत. त्यांच्या प्रवेशाने मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाली आहे. सर्वेक्षणांनुसार बडोले हे मतदारसंघातील सरस उमेदवार मानले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ होऊ शकते.
भाजप-राष्ट्रवादी युतीची परीक्षेची वेळ
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील या नव्या युतीची पहिली परीक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे. भाजपचे पारंपारिक मतदार बडोले यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर मतदान करतील का, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बडोले यांना कितपत साथ दिली, हेही महत्वाचे ठरेल. मतदारसंघातील जनतेचा कौल या नव्या युतीच्या यशापयशाचे खरे मोजमाप ठरणार आहे.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील हे नव्या राजकीय समीकरणाचे यश कितपत ठरेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.