महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतरही मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद देण्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, तसेच देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या बैठकीनंतर पक्षीय मंत्रिपदांचे वाटप ठरवले गेले आहे. एकनाथ शिंदे गटाने 12 मंत्रिपदांसह गृहमंत्रिपदाची मागणी केली होती, तर भाजपने प्रमुख खात्यांवर आपला हक्क सांगितला आहे. यानुसार, महायुतीतील पक्षांना पुढीलप्रमाणे खाती देण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे:
भाजपला मिळणारी खाती:
भाजपने राज्याच्या प्रशासकीय नियंत्रणातील महत्त्वाची खाती राखली आहेत. यामध्ये गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, ग्रामविकास, सामान्य प्रशासन, पर्यटन, आणि ओबीसी मंत्रालय यांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदे गटाला मिळणारी खाती:
शिंदे गटाला नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, आणि परिवहन ही खाती दिली जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाला मिळणारी खाती:
अजित पवार गटाला अर्थ, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, मदत व पुनर्वसन, आदिवासी विकास, अल्पसंख्याक, वैद्यकीय शिक्षण, आणि अन्न व नागरी पुरवठा ही खाती देण्यात येतील.
आज मुंबईत महायुतीच्या नेत्यांची अंतिम बैठक होणार असून, त्यात या खात्यांच्या वाटपावर शिक्कामोर्तब होईल. महायुतीतील या निर्णायक वाटपानंतर सरकार स्थिरतेकडे वाटचाल करेल, अशी अपेक्षा आहे. तसेच, सर्व पक्षांना समाधानकारक वाटप झाल्याचे पक्षीय नेत्यांनी संकेत दिले आहेत.
महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे नवे सरकार ठोस निर्णय घेईल व राज्याच्या विकासासाठी कामाला लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.