मुंबई, दि. ५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी जनतेसाठी सामाजिक बांधिलकी दाखवणारा निर्णय घेतला. त्यांनी पहिली स्वाक्षरी पुण्यातील रुग्णाला वैद्यकीय मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
पुण्यातील चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी पाच लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी या विनंतीला तत्काळ मान्यता देत फाईलवर सही केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला. या कृतीने त्यांनी जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य असल्याचे दाखवून दिले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. या निधीतून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे कुऱ्हाडे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.
शासनाच्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना आशेचा किरण मिळत असून, लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचे सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(संवाददाता)