अर्जुनी मोर: सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय क्षयरोग दूरकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत, शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ ग्रामीण रुग्णालय, अर्जुनी मोर येथे ७ डिसेंबर रोजी करण्यात आला. हे अभियान ७ डिसेंबर २०२३ ते २४ मार्च २०२५ पर्यंत राबवले जाणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे तसेच तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
टीबी मुक्त भारत अभियानाचे उद्दिष्ट:
या अभियानाअंतर्गत निक्षय शिबिरांच्या माध्यमातून समाजातील उच्च जोखमीच्या गटांवर लक्ष केंद्रित करून तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यात दोन आठवड्यांहून अधिक काळ खोकला होणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकीतून रक्त पडणे, पूर्वी टीबी झालेल्या रुग्णांचे सहवासातील लोक, एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषित व्यक्ती, साठ वर्षांवरील नागरिक, मधुमेह बाधित तसेच धूम्रपान करणारे यांची तपासणी करण्यात येईल. तपासणीत टीबी निदान झाल्यास रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे.
भारत सरकारचे उद्दिष्ट:
भारत सरकारने २०२५ पर्यंत देशाला टीबीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या अभियानाच्या माध्यमातून टीबीवर प्रभावी उपाययोजना केल्या जातील आणि रुग्णांना वेळेवर उपचार देऊन समाजातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला जाईल.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर संचालन वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक कु. राजवाडा शेख यांनी केले. या प्रसंगी आशा सेविका, गटप्रवर्तक व नागरिकांनी सहभाग नोंदवला. क्षयरोगाशी संबंधित कोणतेही लक्षण आढळल्यास नागरिकांनी त्वरित तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
टीबीविरुद्धच्या या लढ्यात अर्जुनी मोरगाव तालुका पुढाकार घेत असून, आरोग्य विभागाचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे.