अर्जुनी/मोर: वडसा मुख्य रस्त्यावर ईसापूर जवळील धक्कादायक घटना समोर आली आहे. इसापूर येथील ६५ वर्षीय शेतकरी वासुदेव विठोबा लांजेवार यांचा ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला.
ही घटना ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास इसापूर-माहूरकुडा जोड रस्त्यावर घडली. वासुदेव लांजेवार हे आपल्या शेताकडे जात असताना अर्जुनी मोर येथून वडसा दिशेने जाणाऱ्या धानाचा कोंडा भरलेल्या ट्रक (क्रमांक एम.एच. ४९ ए.टी. ३२५९) पलटला. दुर्दैवाने, हा ट्रक वासुदेव यांच्यावर पडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. दोन जेसीबींच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, अर्जुनी मोर येथे पाठवण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
— प्रतिनिधी