📍 विधानभवन, नागपूर
महाराष्ट्र विधानसभेत माजी मंत्री आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले यांनी म. वि. स. नियम १०१ अन्वये अल्पकालीन चर्चेत भाग घेत, परभणीतील संवेदनशील घटनेवर आपले मत मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरू व्यक्तीने विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी राजकुमार बडोले यांनी सदनाचे लक्ष वेधत, अशा प्रकाराचा भारतीय संविधानावरच नव्हे, तर संपूर्ण देशावर झालेला अपमान असल्याचे ठामपणे मांडले.
संविधानाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान
राजकुमार बडोले म्हणाले, “भारतीय संविधान हा देशातील प्रत्येक नागरिकाचा आधारस्तंभ आहे. हे केवळ पुस्तक नसून देशाच्या सामाजिक न्यायाचा आणि प्रगतिशील विचारांचा जाहीरनामा आहे. त्यामुळे संविधानाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कडक शिक्षेस सामोरे जावे लागेल.”
परभणी बंद दरम्यानच्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशीची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी या घटनेच्या निषेधार्थ ११ डिसेंबर रोजी बंद पुकारला होता. यावेळी हिंसाचार आणि पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी असल्याचे समोर आले आहे. बडोले यांनी या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, तसेच मृत सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी ठाम मागणी विधानसभेत केली.
राजकुमार बडोले यांचा आक्रमक पवित्रा
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे देशातील समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक आहे. त्याची विटंबना सहन केली जाणार नाही. जनतेत मोठा उद्रेक आहे, आणि या प्रकरणावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे,” असे राजकुमार बडोले यांनी ठणकावून सांगितले.
राजकुमार बडोले यांनी केलेली मागणी आणि विधानसभेतील आक्रमक भूमिका यामुळे या प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
#AapleSarkar #vidhansabha #maharashtra #MaharashtraVidhansabha #NCP #Mahayuti