पवनी (जि. भंडारा):
कन्हाळगाव येथील प्रबुद्ध विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेण्याचा सखोल संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव व माजी मुख्याध्यापक मा. अरविंद धारगावे होते. प्रमुख अतिथी म्हणून व्ही. एस. वाणी यांची उपस्थिती लाभली होती. प्रारंभिक प्रास्ताविक के. एस. जांभूरे सरांनी केले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. शंकर बागडे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर शिक्षण, अभ्यास आणि वाचन याला प्राधान्य दिले. त्यांनी अठरा ते एकवीस तास अभ्यास केला, विविध पदव्या प्राप्त केल्या, लाखो ग्रंथ वाचले आणि त्याचं संगोपन करण्यासाठी राजगृह सारखा ग्रंथालययुक्त बंगला उभारला.”
ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना आदर्श मानून शिक्षण, कष्ट आणि ज्ञानार्जनाच्या मार्गावर चालावे. समाज आणि देशासाठी मोठं योगदान द्यावं, हाच खरा अभिवादनाचा मार्ग आहे.”
या कार्यक्रमात मा. गोवर्धन खोब्रागडे, एस. एस. मेश्राम यांनी देखील मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मंगला निखाडे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन एस. के. जांभूळकर सरांनी केले.
कार्यक्रमास जी. पी. नारनवरे, डी. एस. धारगावे, बी. एस. गजभिये यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली.
