तिरोडा: तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील ज्ञानदा महिला महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात आणि उत्सवमूर्ती वातावरणात साजरी करण्यात आली. समाजसुधारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि शिक्षण क्रांतीचे प्रणेते असलेल्या महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य छोटू देवपुरी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महात्मा फुले यांचे समाजसुधारणेतील कार्य आणि सत्यशोधक समाजाच्या उद्दिष्टांवर सखोल विचार मांडले. ते म्हणाले,
“महात्मा फुले यांनी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून समाजातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांनी जातीभेद आणि चातुर्वर्णीय भेदभावाला विरोध करत समानतेच्या तत्वांची रुजवण केली.”
महात्मा फुले यांचे विचार आजही प्रेरणादायी – प्रा. छाया राऊत
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापिका छाया राऊत मॅडम यांनी महात्मा फुले यांच्या विचारसरणीचा जागर करत एक प्रसिद्ध श्लोक उद्धृत केला –
“विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.”
त्या पुढे म्हणाल्या, “महात्मा फुले यांनी बहुजन समाजाच्या अज्ञान, दारिद्र्य आणि जातीय विषमतेच्या विरोधात लढा उभारला. त्यांनी स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षण मिळावे यासाठी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली मराठी शाळा स्थापन केली. त्यांच्या कार्यामुळेच स्त्री-शिक्षणाचा मार्ग सुकर झाला.”
फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा महाराष्ट्राचा आधारस्तंभ – प्रा. विजय रंगारी
भौतिकशास्त्राचे प्राध्यापक विजय रंगारी यांनी महात्मा फुले यांच्या विचारधारेला व्यापक ऐतिहासिक संदर्भात जोडून स्पष्ट केले की,
“महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला आहे, म्हणूनच या राज्याला ‘फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ असे ओळखले जाते. १९७७ च्या टपाल तिकीटावर महात्मा फुले यांचे योगदान अधोरेखित करणारा ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा प्रसिद्ध ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.”
त्यांनी पुढे महात्मा फुले यांच्या लेखनकार्याबाबत बोलताना सांगितले की, “फुले यांनी जातीभेद, अंधश्रद्धा, आणि उच्चवर्णीय मक्तेदारीविरोधात आपल्या साहित्यातून आवाज उठवला. त्यांचे लेखन समाजाच्या परिवर्तनाची वाट दाखवणारे आणि समताधिष्ठित समाज निर्माण करणारे होते.”
कार्यक्रमाची सांगता आणि प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एच. गौरखेडे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. आर. डी. काटेखाये मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अविनाश कांबळे, प्रा. ए. एस. वासनिक, निरंजन जनबंधू, दिगांबर राऊत, चंद्रशेखर उपरीकर, रत्नदीप बडोले, सुमेध शहारे, साक्षी राणे, निकीता कटरे, रोशनी भगत, बबिता उपवंशी, प्रियंका गजभिये आणि ममता बडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
