प्रतापगड | महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रतापगड येथे शिवभक्तांसाठी भव्य महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या विशेष प्रसंगी माजी मंत्री आणि आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित राहून भक्तगणांना महाप्रसादाचे वितरण केले व त्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी हजेरी लावली. भगवान महादेवाच्या दर्शनाने परिसर भक्तिमय झाला होता. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात मंदिर परिसर गजबजून गेला होता. श्रद्धा आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन आणि अभिषेक यांचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार राजकुमार बडोले यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “भगवान शिव हे भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असून, त्यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नक्कीच येईल. असे धार्मिक आणि सामाजिक उपक्रम सतत होत राहावेत.”
महाशिवरात्रीच्या निमित्ताने झालेल्या या भक्तिमय सोहळ्यात परिसरातील शिवभक्तांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मंदिर प्रांगणात भक्तीभावाने महादेवाचे दर्शन घेण्यास भक्तांची गर्दी उसळली होती.