प्रतापगड : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर प्रतापगड येथे भव्य मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराद्वारे दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा पुरविण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत तपासणी, विविध आजारांवरील उपचार तसेच आरोग्य जनजागृतीपर माहितीपर स्टॉल्स लावण्यात आले होते.
या शिबिराचे अध्यक्षस्थान आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी भूषविले, तर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती चेतनजी वळगाये, जिल्हा परिषद सदस्य कविताताई रंगारी, माजी उपसभापती होमराजजी पुस्तोडे, पंचायत समिती सदस्य नूतनलालजी सोनवणे, राजहंसजी ढोके, प्रतापगडचे सरपंच भोजराजजी लोगडे, केशोरचे सरपंच नंदकुमार गहाणे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती.
या शिबिराद्वारे अनेक गरजू रुग्णांना त्वरित उपचार मिळाले, तसेच औषधोपचार आणि पुढील वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.