अर्जुनी-मोर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. वन हक्क दावे आणि नागरिकांच्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. शेकडो नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या, त्यातील अनेक समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात आले, तर काही प्रकरणे तपासणीसाठी पाठवण्यात आली.
या जनता दरबारात आमदार राजकुमार बडोले यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांचे म्हणणे ऐकले आणि प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. अनेक नागरिकांनी वन हक्क दावे, महसूल विभागाशी संबंधित तक्रारी, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, शेती वसुली, तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी यासंदर्भात आपली गाऱ्हाणी मांडली.
आमदार बडोले यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, “वन हक्क दावे निकाली काढण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच, कोणत्याही नागरिकाच्या हक्कांवर अन्याय होणार नाही. प्रशासनाच्या मदतीने तातडीने उपाययोजना केल्या जातील.”
महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती:
या विशेष जनता दरबारात आमदार राजकुमार बडोले यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमाताई ढेंगे, उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, अर्जुनी-मोर तहसीलदार अनिरुद्धजी कांबळे, सडक अर्जुनी तहसीलदार इंद्रायणी गोमासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर, अर्जुनी-मोर पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, सडक अर्जुनी पंचायत समिती सभापती चेतनजी वळगाये, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यशवंतजी परशुरामकर, नगराध्यक्ष मंजुषाताई बारसागडे, जिल्हा परिषद सदस्य कविताताई रंगारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, प्रकल्प निष्कासन अधिकारी मेश्रामजी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी गोठणगाव पवारजी, नवेगाव बांध अवघानजी, अर्जुनी-मोर बहुरेजी उपस्थित होते.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लोकपालजी गहाणे, भाजप तालुकाध्यक्ष विजयजी कापगते, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरजी तरोणे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद:
नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही होत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. अनेक नागरिकांनी आमदार राजकुमार बडोले यांचे आभार मानले. यामुळे वन हक्क दावे निकाली काढण्याची प्रक्रिया गतीमान होण्याची अपेक्षा आहे.
