मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शपथविधी सोहळा पार पडला आहे, तर महाराष्ट्रातील आमदारांचा शपथविधी सध्या सुरू आहे. मात्र, निवडणुकीच्या निकालांनंतरही विरोधक ईव्हीएमवर (EVM) आरोप करत असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“ईव्हीएम निवडणुकीत फक्त विरोधकांच्याच वेळी बिघडतात?”
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागला की, ईव्हीएम मशीन चांगल्या ठरतात. पण निकाल विरोधात गेला की, लगेच ईव्हीएमवर घोटाळ्याचे आरोप सुरू होतात. विरोधी पक्षाकडे आता कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना चारीमुंड्या चित केले आहे.”
“विकासाच्या मुद्यावर बोला!”
शिंदे यांनी विरोधकांना विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. “ईव्हीएमचे रडगाणं सोडून विकासाचं गाणं गा,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
जनमताचा सन्मान करा – शिंदे
“नाना पटोले २०० मतांनी जिंकले, रोहित पवार ११०० मतांनी जिंकले. मग काय म्हणायचं? याचा अर्थ निकाल लोकशाही पद्धतीने लागला आहे. संविधानाच्या चौकटीत राहून जनमताचा सन्मान करायला हवा. कोणतीही यंत्रणा यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेत, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सकारात्मक पावले उचलण्यावर भर देण्याचे आवाहन केले.