नागपूर: “ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेत गडबड केली जाते आणि मतांची चोरी होत असल्याचा संशय जनतेमध्ये आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर मतदान घेतले पाहिजे. जर मतपत्रिकेवर मतदान घेतले जाणार असेल, तर मी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्यास तयार आहे,” अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.
नाना पटोले नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ईव्हीएममधील मतदानाबाबत काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. “अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएमच्या निकालांमध्ये तफावत दिसून येते. सायंकाळी ५ ते रात्री ११.३० या वेळेत मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचा दावा केला जातो, पण त्या वेळी मतदारांच्या रांगा कुठे होत्या, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे. मला निवडणूक लढण्याचे आव्हान देणाऱ्यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाकडून आणून दाखवावा,” असे आव्हान त्यांनी दिले.
फडणवीस यांना शुभेच्छा, पण महत्त्वाचे प्रश्न उपस्थित
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्र पुढे जावा, येथील युवकांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, राज्यात सध्या दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत, ती भरून युवकांना न्याय द्यावा. राज्य सरकारने कंत्राटी भरती केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता त्यांनी कंत्राटी भरती करू नये. तसेच कापूस आणि सोयाबीनाला चांगला भाव मिळावा,” अशी अपेक्षा पटोलेंनी व्यक्त केली.
“शपथविधीला निमंत्रणच नव्हते”
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहण्याबद्दल विचारले असता नाना पटोले म्हणाले, “मला शपथविधीचे निमंत्रणच देण्यात आले नव्हते. जर निमंत्रण मिळाले असते, तर मी शपथविधीला गेलो असतो. महायुतीच्या नेत्यांनी कोणा-कोणाला निमंत्रण दिले, हे मला माहिती नाही. पण मला तरी निमंत्रण नव्हते.”
नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मतपत्रिकेवर आधारित मतदानासाठीची त्यांची मागणी कितपत मान्य होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.