भंडारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या भंडारा जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने माजी मंत्री व अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. राजकुमार बडोले यांनी त्यांची हेलिपॅडवर भेट घेतली. यावेळी थायलंड येथून आणलेली बुद्ध मूर्ती भेट स्वरूपात देऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला.
थायलंडमध्ये बौद्ध धर्माच्या विचारांचा आणि संस्कृतीचा विशेष आदर आहे. या पार्श्वभूमीवर थायलंडहून आणलेल्या बुद्ध मूर्तीचे मुख्यमंत्री फडणवीस यांना हस्तांतरण हे सांस्कृतिक वारशाचा आदर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचा सन्मान व्यक्त करणारे ठरले आहे.
यावेळी बडोले यांनी मुख्यमंत्र्यांशी जिल्ह्याच्या विकास कामांबाबत चर्चा केली आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रकल्पांवर लक्ष वेधले. विशेषतः शेतकरी कल्याण, शिक्षण, आरोग्यसेवा आणि स्थानिक पातळीवरील रोजगार निर्मितीबाबत काही प्रस्तावही मांडले.
मुख्यमंत्र्यांनी या भेटीचे कौतुक करत बौद्ध मूर्तीच्या माध्यमातून दिलेल्या आदरभावनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांसाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
ही भेट राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात असून, या माध्यमातून जिल्ह्याच्या समस्यांना शासनाकडे अधिक प्राधान्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
