नवेगावबांध, २७ जानेवारी – नवेगावबांध-बाराभाटी मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आज २७ जानेवारी रोजी आमदार राजकुमार बडोले यांनी नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
यावेळी आमदार बडोले यांनी कुटुंबीयांची समजूत काढत त्यांना धीर दिला आणि या कठीण प्रसंगात त्यांच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले. तसेच, या अपघातामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचे आश्वासन
आमदार बडोले यांनी जखमी दुचाकी चालकाच्या आरोग्याविषयीही विचारपूस केली आणि त्यांच्या त्वरित व योग्य उपचारांसाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच, शासनस्तरावरून या कुटुंबाला मदतीसाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानीय नागरिक आणि ग्रामस्थांनी रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
