भंडारा : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, साकोली तालुक्यातील एका गरोदर महिलेला नोकरीचे आमिष दाखवून नागझिरा अभयारण्यातील एका रिसॉर्टमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सानगडी येथील आरोपी ज्ञानेश्वर उर्फ बंडू लिचडे (वय ५०) याच्याविरोधात साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
घटना कशी घडली?
२६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आरोपी बंडू लिचडे याने पीडित महिलेच्या घरी जाऊन, “तुझा ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण झाला आहे. भंडारा येथे तुला चांगली नोकरी मिळवून देतो,” असे सांगितले. त्यानंतर त्याने तिला साकोली बसस्थानकावर येण्यास सांगितले.
महिला ठरलेल्या वेळी बसस्थानकावर पोहोचताच आरोपीने तिला आपल्या कारमध्ये बसवले. मात्र, भंडाऱ्याला न नेताच त्याने थेट नागझिरा अभयारण्य परिसरातील पिटेझरी येथील टायगर रिसॉर्टमध्ये नेले. तिथे एका खोलीत नेऊन त्याने महिलेला “तू मला खूप आवडतेस,” असे म्हणत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
घटनेनंतर त्याच दिवशी संध्याकाळी आरोपीने महिलेला पुन्हा साकोली बसस्थानकावर आणून सोडले.
गुन्हा उघडकीस कसा आला?
पीडित महिलेने घरी परतल्यानंतर कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, ३१ जानेवारी रोजी तिची प्रकृती खालावली आणि तिला शारीरिक त्रास जाणवू लागला. अखेर तिने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी तिला सोबत घेऊन ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साकोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
आरोपीविरुद्ध कठोर कारवाई
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी बंडू लिचडे याला तातडीने अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (२), (एच) ६९ २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला १५ फेब्रुवारीपर्यंत भंडारा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांचा तपास सुरू
या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर आणि उपनिरीक्षक सुमित्रा साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तींवर विश्वास ठेऊन कुठेही जाण्याआधी योग्य माहिती घ्या आणि गरज असल्यास पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.
