मुंबई | राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, ३ मार्च २०२५ पासून सुरू होणार असून, ते २६ मार्चपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला जाणार आहे. विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली.
विधानभवन, मुंबई येथे झालेल्या या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी, ८ मार्च (शनिवार) रोजी सार्वजनिक सुटी असली तरी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर १३ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत मंत्री गिरीष महाजन, शंभुराज देसाई, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲड. अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल आदींनी सहभाग घेतला. विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे व विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.
