विधानसभा अधिवेशनात आमदार राजकुमार बडोले यांची आरोग्य सेवांच्या सक्षमीकरणासाठी ठोस मागणी

0
28

मुंबई: आज दिनांक ६ मार्च २०२५ रोजी विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ चा चौथा दिवस संपन्न झाला. या अधिवेशनात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी क्षेत्रातील आरोग्यविषयक महत्त्वाच्या समस्या मांडल्या. त्यांनी राज्य सरकारकडे आरोग्य सुविधांच्या सुधारणेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली.

राजकुमार बडोले यांनी आपल्या भाषणात प्रथम कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले. तथापि, त्यांनी जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये नर्स, सहायक तंत्रज्ञ, सफाई कर्मचारी आणि इतर पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आणले. या रिक्त पदांमुळे आरोग्य सेवांवर परिणाम होत असून, अनेक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी ही पदे तात्काळ भरून आरोग्य सेवांना बळकटी देण्याची मागणी केली.

याशिवाय, बडोले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक फर्निचर, यंत्रसामग्री आणि इतर साहित्याचा अभाव असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सरकारला ही कमतरता दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात दोन उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरी मिळाली असून, त्यांच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.

ग्रामीण भागात कॅन्सरचे वाढते प्रमाण हा आणखी एक गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला. कॅन्सरच्या सुरुवातीच्या चाचण्या करण्यासाठी निधीची गरज असल्याचे सांगत, त्यांनी यासाठी विशेष तरतूद करण्याची विनंती केली. आपल्या भाषणातून त्यांनी आरोग्य सेवांच्या सक्षमीकरणावर भर देत, ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारचे लक्ष वेधले.

त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर या मागण्यांची माहिती शेअर करत जनतेला या चर्चेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. त्यांचे अधिकृत एक्स हँडल (@rajkumarsbadole) फॉलो करण्याचेही त्यांनी सुचवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here