– वार्ता प्रतिनिधी | नवेगावबांध
“अनुसूचित जातीचे लोकप्रतिनिधी निवडून आले, सत्तेवरही गेले… पण त्यांनी अस्पृश्य समाजासाठी हवे तेवढे काही केलं नाही, ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे,” अशा कठोर आणि स्पष्ट शब्दांत माजी सामाजिक न्याय मंत्री आणि विद्यमान आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी समाजातील विदारक वास्तव मांडलं आहे.
लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेलवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित आजचा भारत’ या विषयावर झालेल्या चर्चेत बडोले यांनी विद्यमान दलित नेतृत्वावर अप्रत्यक्ष पण घणाघात करणारा टोला लगावला.
बडोले म्हणाले –
“राजकीय सत्तेचा वापर स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी होताना दिसतो. समाजासाठी ठोस धोरणं राबवणं, शिक्षण, आरोग्य, न्याय मिळवून देणं – या सगळ्या जबाबदाऱ्या फक्त भाषणापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. आंबेडकरी विचार केवळ बॅनरवर किंवा जयंत्यापुरता उरू नये; तो कृतीत उतरवणं गरजेचं आहे.”
सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर अनेक लोक मूळ समाजाशी नातं तोडतात, ही खंतही त्यांनी मांडली.
“बाबासाहेबांनी संघर्ष करून मिळवून दिलेल्या अधिकारांची आणि संधींची काय दिशा झाली? अनेकांनी त्या संधींचा वापर केवळ स्वतःच्या उन्नतीसाठी केला, समाजासाठी नव्हे,” असे ते म्हणाले.
मुलाखतीतील काही महत्त्वाचे मुद्दे –
आंबेडकरांनी अपेक्षित केलेला समतेचा भारत अजूनही दूर
राजकीय लोकप्रतिनिधींनी कृतीशून्य भूमिका घेतली
दलित समाजाचे मुद्दे केवळ निवडणुकीपुरते वापरले जात आहेत
सामाजिक जागृतीसाठी नव्या पिढीने नेतृत्व घ्यावं
राजकीय नेतृत्व आणि आंबेडकरी तत्वज्ञान यामध्ये निर्माण झालेल्या दरीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
“या देशात केवळ एक दोन चांगले नेता झाले म्हणजे पुरेसे होत नाही, प्रत्येक गावातून, वस्तीतून एक आंबेडकरी नेता घडायला हवा. बाबासाहेबांचं स्वप्न हे केवळ संविधान पुरतं नव्हतं, ते सामाजिक परिवर्तनाचं होतं,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
ही मुलाखत केवळ टीका नसून, अंतर्मुख करणारी होती – आणि नव्या पिढीला दिशा देणारी देखील.
