मुंबई – विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या कारवाईनंतर सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे – “पुढे अशा कारवायांसाठी तुम्हीच उपस्थित राहा!”
महानगरपालिकेने या ठिकाणी पूर्वी नऊ वेळा नोटीस बजावली होती. मंदिराचे बांधकाम सुमारे 90 वर्षे जुने असल्याचा दावा खोटा असल्याचे समोर आले असून, न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनंतर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आलेली बदली ही राजकीय दबावाखाली घेतलेला निर्णय असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे.
मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनने या प्रकरणी तीव्र भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, “न्यायालयाच्या आदेशावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला जर शिक्षा मिळणार असेल, तर पुढे कुणीच कारवाईस धजावणार नाही.”
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मंदिराच्या उर्वरित भागावर 30 एप्रिलपर्यंत अंतरिम स्थगिती दिली असून, या प्रकरणाने राजकीय हस्तक्षेप व प्रशासकीय निर्णय प्रक्रिया यावर नव्याने चर्चा सुरू केली आहे.
